बुलडाणा - कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरल्यास, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावल्यास दंड लागू केला आहे.
असे आहेत दंड -
सार्वजनिक स्थळी उदा. रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय या ठिकाणी थुंकताना पहिल्यांदा आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी मास्क अथवा रूमाल न वापरताना पहिल्यांदा आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास 500 रूपये दंड, हाच दंड दुकानदार आणि विक्रेत्यांसाठी 1 हजार 500 रूपये आहे. तसेच दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. किराणा अथवा जीवनावश्यक वस्तू वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास 5 हजार रूपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस वसूल करणार आहेत.
वाहन फिरताना आढळल्यास 5 हजाराचे दंड-
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व दुचाकी, तिनचाकी वाहनांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. तसेच वाहनधारक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास संबंधितांवर 5 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.