बुलडाणा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या पायगुणाने ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याच्या चर्चेवर पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता उन्हाळा आला, तलाव सुकलेत, आता कशाचा आला लोटस. महाविकास आघाडीची सत्ता ५ वर्षे स्थिर असून १५ वर्षे ही आघाडी चालणार असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
हेही वाचा - विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील आज बुलडाणा दौऱ्यावर
तसेच, अमित शहांच्या पायगुणांनी सत्ता येण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण व्हावी, सुव्यवस्था राहावी, मतभेद होऊ नये, जात, पात, धर्म मिळून पुन्हा बरकती मिळावी, या देशाच्या संविधानाला मजबुती मिळावी. मग अमित शहांचे स्वागत करायला आनंद होईल, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रत्नागिरीमध्ये आले होते. ओबीसीच्या मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी महासंघाच्या वतीने अधिवेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत. आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विदर्भ स्तरीय ओबीसी आरक्षण बचाव महाधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अमित शहांवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते दिलीप सानंद यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
भाजपची भूमिका दुटप्पी
विद्युत महावितरणच्या आंदोलनावर बोलताना, भाजपची भूमिका दुटप्पी आहे. मूह मे राम और बगल मे छुरी, अशी भाजपची भूमिका आहे. रामाच्या नावाने तुम्ही विभाजन करू नये. भाजपने राजकारण करू नये. राम हृदयात असला पाहिजे. हृदयाचा राम शोधून दगडाचा राम शोधू नकोस. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून भाजपने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. हे पाप करू नये, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.
हेही वाचा - मुख्यमंत्री महोदय, इकडेही लक्ष द्या; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न