बुलडाणा - भारतीय वायूसेनेच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटे पीओकेत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय वायूसेनेचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या नितिन राठोडच्या वडिलांनी हल्ल्याचा बदला पूर्ण झाला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, की पाकिस्तानवरील हल्ले हे सुरुच ठेवले पाहिजेत. थोड्या फार प्रमाणात समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान कारवाईबाबतची विस्तृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.