बुलडाणा - आजच्या स्पर्धेच्या युगात थोडेसे अपयश आले, की काही लोक निराश होतात. मात्र, अपघाताने नशिबी आलेल्या अंधत्वावर आणि गरिबीवर मात करत नामदेव रघुनाथ शिंदे यांनी स्वतःचा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला आहे. ते या व्यवसायातून इतर अंध बांधवानांही रोजगार देणार आहेत. त्यामुळे त्यांचे या व्यवसायाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नामदेव हे जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. त्यांची पत्नी देखील अंध असून त्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे. ते सध्या जालना येथे राहतात. सुरुवातीला नामदेव यांनी रेल्वेत गोळ्या-बिस्कीट विकले. त्यावेळी त्यांना लोक कुत्सितपणे हसले. काहींनी त्यांना भीक मागण्याचा देखील सल्ला दिला. मात्र, नामदेव खचून गेले नाहीत.
नामदेव यांनी एका कारखान्यात अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बँकेतून कर्ज काढून अगरबत्तीचा उद्योग करण्याचा निर्णय घेतला. बँकेने त्यांना कर्ज दिले आहे. त्यातून त्यांनी एक मशीन विकत घेतली. परंतु, मशीनचे ट्रेनिंग आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी थेट बुलडाणा गाठले. चिखली रोडवरील श्रीकृष्ण नगरात जगननाथ चव्हाण व राहुल चव्हाण यांच्या 'कार्तिक परफ्यूमरी वर्क्स'मध्ये त्यांना निशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. अंधत्वावर मात करून नामदेव मशिनवर झपाट्याने अगरबत्ती तयार करतात. आता त्यांना याच कामातून रोजगार उपलब्ध होणार आहे.