बुलडाणा - बुलडाण्यातील धाड येथील पोलीस ठाण्यापासून अवघ्या ६० फूट अंतरावर असलेली ७ दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी ८ ऑक्टोबरच्या रात्री घटना घडली. ज्या चोराने दुकाने फोडली त्याने अंगावर एकही कपडा घातला नसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर आले आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
हेही वाचा - आरटीआय कार्यकर्त्या अॅड. अंकिता शाह यांना पोलिसांची धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल
धाड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेले चिरानिया ट्रेडर्स कंपनीच्या छताचा टिनपत्रा वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातून हजारो रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर लक्ष्मी बिकानेर स्वीटमार्ट फोडून १० ते १५ हजार रुपये, रॉयल इलेक्ट्रिकल फोडून पॉलिकेप वायरचे १२-१३ बंडल ( किंमत अंदाजे १५ हजार रुपये) तर सोनल अॅग्रो ट्रेडर्स, वर्षा इलेक्ट्रिक, रॉयल इलेक्ट्रिकल व शेतकरी ट्रेडर्सही फोडले. या दुकानांमध्ये चोरट्याला हजार-दीड हजाराच्या रोकडवरच समाधान मानावे लागले.
एकाच रात्री ७ दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी धाड पोलिसांत तक्रारी दिल्या असून चोरटा हा अंगावर एकही वस्त्र नसलेल्या अवस्थेतेतील आहे. चोरट्याने टिनपत्रे वाकवून चिरानिया ट्रेडर्समध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर दुकानातील गल्ल्याकडे धाव घेतली. गल्ला उघडून त्यात असलेली हजार-दीड हजार रुपये रोकड घेऊन परतीचा मार्ग धरला. मात्र, चोरी करत असलेला हा विवस्त्र चोरटा 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा - राजस्थानातील बनावट आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक