बुलडाणा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने पावले उचलत जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठी देखील त्यांच्या ऑपरेशनसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच महत्वाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात आजपर्यंत म्यूकरमायकोसिसचे 27 बाधित रुग्ण
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांबरोबर म्यूकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण देखील वाढताना दिसत असून जिल्ह्यात आजपर्यंत 27 बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पुढच्या काळात म्यूकरमायकोसिस रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी ऑपरेशनची देखील गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने अशा रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. शिगणेंनी दिली.
लोकसहभागातून गावांमध्ये निर्माण केले विलगीकरण कक्ष
जिल्ह्यातील किन्होळा, भादोला, केळवड, डोनगाव या गावाने पुढाकार घेत लोकसहभागातून गावामध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले आहेत. तसेच विलगीकरण कक्ष जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुरू करावे, अशा सूचना पालकमत्र्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
हेही वाचा - अहमदाबादमधील 13 वर्षीय मुलाला ‘म्युकरमायकोसिस’ ची लागण
हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे