बुलडाणा - बुलडाण्याच्या कोरोना आरटीपीसीआर प्रयोगशाळेत केवळ सहा महिन्यातच 1 लाखांच्यावर कोरोनासाठीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बुलडाण्यातील संशयित रुग्णांचे स्वॅब अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत होते. त्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाठपुरावा करत स्त्री कोविड रुग्णालयाच्या मागील बाजूस आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यन्वित करण्यात आली. 24 सप्टेंबर, 2020 रोजी या ठिकाणी चाचणी करण्यास सुरुवात झाली होती.
मर्यादापेक्षा दुप्पट झाल्या आरटीपीसीआर तपासण्या
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संशयित रुग्णांचे अहवाल तत्काळ येणे गरजेचे असते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवणे त्यांच्याशी संबंध आलेल्या शोधून त्यांची कोरोना तपासणी करणे गरजेचे असते. बुलडाणा जिल्ह्यातील प्रयोगशाळेत असलेल्या मनुष्यबळानुसार प्रयोगशाळेत दिवसाला 1 हजार ते 1 हजार 200 पर्यंत आरटीपीसीआर तपासणीची मर्यादा आहे. मात्र, प्रयोगशाळेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने दररोज प्रयोगशाळेत 1 हजार 800 ते 2 हजारपर्यंत आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. यामुळे केवळ सहा महिन्यातच प्रयोगशाळेतील योद्धांचे कार्य कौतुकास्पद ठरले. आजपर्यंत 1 लाखांच्यावर आरटीपीसीआर नमुन्यांची तपासणीचा आकडा गेला. यापुढेही अशाच पद्धतीने कोरोनाशी लढण्यासाठी तयार असल्याचे प्रयोगशाळेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्वाही दिली आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी घेतले परिश्रम
या प्रयोगशाळेत 1 वैद्यकीय अधिकारी व 31 टेक्निशियन आपले कर्तव्य बजावत असून प्रयोगशाळा सुरू होण्यापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सचिन वासेकर, नोडल अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी डॉ. पल्लवी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयसिंग राजपूत, डॉ. कमर खान, डॉ. हिदायत खान, डॉ. शीतल सोळंके, अमित किन्हीकर, अमोल साळोख, गजानन भोरखळे, महेश मेहेत्रे, सचिन राठोड यांच्यासह प्रयोगशाळेतील आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे
हेही वाचा - बुलडाणा : विनापरवानगी वृक्ष तोडणाऱ्या तिघांना अटक