बुलडाणा - धनुर्विद्या स्पर्धेत बुलडाणा पोलीस दलातील शिपाई मोनाली जाधवने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पश्चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या या यशाचे बुलडाणा पोलीस दलासह जिल्हाभरातून कौतूक होत आहे.
मोनाली जाधव ही २०१३ मध्ये पोलीस दलात भरती झाली असून, ती बुलडाण्यामधील आनंद नगर येथील रहिवासी आहे. ती आंतरराष्ट्रींय खेळाडू म्हणूनही प्रसिध्द आहे. सध्या ती जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर यादरम्यान पश्चिम बंगाल येथे अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत तिने ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदकाची कमाई केली.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत देशातील अर्धसैनिक बलाचे ४४ आणि बलातील ५२३ खेळाडू सहभागी झाले होते. यापूर्वी देखील मोनालीने विश्व पोलीस क्रीडा स्पर्धेत १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकलेले आहे. ती भारतीय धनुर्विद्या संघात विश्वकप देखील खेळली आहे. बुलडाण्यात मोनाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आईसोबत राहते.
मोनालीच्या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी बुलडाणा पोलीस दलातर्फे २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील घोषित केले आहे. यासोबतच पोलीस विभागातील तरतुदी नुसार मोनालीला पोलीस शिपाई पदावरून पदोन्नती देण्यात येणार आहे. संदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
