बुलडाणा - महार रेजिमेंटचे जवान कैलास भारत पवार हे सियाचीन येथे आपले कर्तव्य बजावताना असताना बर्फाळ डोंगरावरुन पाय घसरुन पडल्याने त्यांना वीरमरण आले होते. ते मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी होते. बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) चिखली शहरातील तालुका क्रिडा संकुलच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीर जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आल्याची माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला 1 ऑगस्टला कळविण्यात आली होती. बुधवारी (4 ऑगस्ट) वीर जवान कैलास पवार यांचे पार्थिव त्याच्या मुळगाव असलेल्या चिखली येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरापासून ते तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी भारत माता की जय.., अमर रहे अमर रहे वीर जवान कैलास पवार अमर रहे.., वंदे मातरम्... अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी रस्त्यांवर वीर कैलास पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारे बॅनर लावले होते. ज्या मार्गाने अंतयात्रा रवाना झाली. त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेद्र शिगंणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे भास्कर पडघान, चिखलीचे आमदार श्वेता महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री शेळके यांच्यासह उपस्थित अनेकांनी पूष्पचक्र वाहून आंदरांजली वाहिली. त्यानंतर बीएसएएफच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर वीर जवान कैलास पवार यांच्या पार्थिवाला त्याचे मोठे भाऊ अक्षय पवार यांनी मुखअग्नी दिली. वीर जवान कैलास पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी चिखली येथील क्रीडा संकुल परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चिखली येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत वीर जवान कैलास पवार यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा - डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुलडाण्यात एमआयएमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण