बुलडाणा - मैत्रीसंबंधात झालेल्या संभाषणाची क्लिप वापरुन एका व्यक्तीला महिलेने ब्लॅकमेल केले. सबंधित महिलेने तिच्या दोन साथीदाराच्या मदतीने 25 लाखांची रक्कम त्या व्यक्तीला मागितली. रोहिणी पवार, राहुल गाडेकर, आणि सचिन बोरडे असे आरोपींची नावे आहेत.
देऊळगाव राजा शहरातील एका व्यक्तीची जालन्यातील रोहिणी पवार या महिलेशी मैत्री झाली. ब्युटी पार्लरसाठी रोहिणीला देऊळगाव राजा शहरात दुकान हवे होते. यातून त्या व्यक्तीची रोहिणीशी मैत्री जमली. मैत्रीत अनेकवेळा दोघांत संभाषण झाले. दोघांतील संवादाच्या क्लिपचा वापरकरुन रोहिणीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन 25 लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही तर ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. ही रक्कम चार टप्यात देण्याचे ठरले होते.
मंगळवारी 30 जूनला रात्री 4 लाखांचा पहिला टप्पा स्वीकारताना रोहिणी नितीन पवार, राहुल सर्जेराव गाडेकर, सचिन दिलीप बोरडे यांना पोलिसांनी देऊळगावराजा येथील चिखली-जालना बायपासवर पकडले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस निरिक्षक मुंकुद देशमुख, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक,पोलीस शिपाई भारत जंगले, महिला पोलीस शिपाई अनुराधा उंबरहंडे यांनी केली.