बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यु'चे आवाहन केले असून सर्व नागरिकांनी या कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यु राहणार आहे. नागरिकांनी स्वत:हून घरातच थांबावे. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे. यादिवशी सायंकाळी नागरिकांनी घराबाहेर येवून कोरोना विषाणू लढाईत उतरलेल्या डॉक्टर्स, नर्स यांचे आत्मबळ वाढविण्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
देश सध्या कोरोना विषाणूशी लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. हे कोरोनाचे संकट सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देत पिटाळून लावायचे आहे, असे शिंगणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.
हेही वाचा - अमेरिकेहून आलेले दोन कोरोना संशयित कन्नडमधून गायब; यंत्रणेत समन्वय नसल्याने गोंधळ