बुलडाणा - देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. बुलडाण्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची महत्वकांक्षी योजना असलेल्या 'शिवभोजन' योजनेचा शुभारंभ देखील आज शहरात करण्यात आले. बुलडाण्यात 3 ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
बुलडाणा शहरातील क्रीडा संकुलासमोरील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी सुमनचंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी षण्मुखराजन आणि अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनीही थाळीचा स्वाद घेतला.
शिंगणे यांनी यावेळी केंद्र चालकाला स्वच्छता आणि जेवणाचा दर्जा ठेवण्याच्या सूचना दिल्या. शिवभोजन केंद्रामध्ये बुलडाण्यात दररोज 40 थाळी देण्यात येणार आहेत. गरीब जनतेला ही थाळी 10 रुपयात मिळणार असून याचे 40 रुपये सरकार भरणार आहे.