बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव येथील कोविड सेंटरमध्ये रविवारी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांना दिल्या जाणारे जेवण निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याच्या तक्रारी आधी पासून करण्यात येत आहेत. मात्र, आता तर जेवणात चक्क अळ्या निघाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णांनी प्रशासनावर आरोप करणारे व्हिडीओ क्वारंटीन सेंटरमधून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
\जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शेगाव शहरसह सहा तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून येत असल्याने रुग्णांना येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन केल्या जात आहे. कोविड सेंटरमधील क्वारंटाईन कक्षात रुग्णांना किमान 10 दिवस येथे भरती करण्यात येते. येथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी रुग्णांना जेवण दिल्या जाते. मात्र, रुग्णांच्या जेवणात रविवारी चक्क अळ्या निघाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन जेवणात निघालेल्या अळ्या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. तर प्रशासन जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालीत असल्याचे आरोप करणारे व्हिडिओही सध्या व्हायरल झाले आहे.