बुलडाणा - अचानक मागणी वाढल्यामुळे किराणा दुकानात आवश्यक वस्तुंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हँडवॉश आणि सॅनिटायझर अजिबात उपल्बध नाही. येणाऱ्या दिवसात हा तुटवडा भरून निघेल, अशी आशा बुलडाण्याचे किराणा दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
पहिला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर 21 दिवसांची संचारबंदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या दोन घोषणानंतर बऱ्याच नागरिकांनी दोन ते तीन महिन्यांचे धान्य आणि किराणा भरून ठेवला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करू नये, अशी विनंती प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी करूनही बऱ्याच नागरिकांनी हा साठा करून ठेवलेला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे बऱ्याच कंपन्या आणि वाहतूकही बंद झाली. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आवश्यक वस्तुंचा पाहिजे तसा पुरवठा झाला नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हात सारखे स्वछ धुवावे, असे सांगितल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी अचानक सॅनिटायझरचीही साठवणूक केली. मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे हँडवॉशची मागणी वाढल्याने दुकानात तुटवडा निर्माण झाला आहे. यासह अत्यावश्यक असलेले तेलाची मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने त्याचे दर वाढविण्यात आले आहे. तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, सर्वच प्रकरच्या डाळी, साबण, बिस्किट यांचासुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे.
जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण होणार नाही असे जरी सांगितले गेले असले, तरी आजघडीला बऱ्याच वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. उत्पादन, पुरवठा आणि मागणी याची साखळी सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत नागरिकांना या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. फक्त हे लवकर सुरळीत व्हावे अन्यथा टंचाईमुळे दरवाढ निश्चित होईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल.