बुलडाणा - जिल्ह्यातील शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी आज (मंगळवारी) चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आंदोलन केले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मका जमिनीवर टाकून शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला.
8 जूनपर्यंत हे खरेदी केंद्र सुरू करावे, असे निवेदन देऊनही केंद्र सुरू न झाल्याने आज (मंगळवारी) हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे रुपयाने नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील मका आणि तुरीचे खरेदी केंद्र सुरू करावे, त्वरित हमीभावाने या पिकांची खरेदी करावी आणि कापसाचे देखील उर्वरित चुकारे पूर्ण करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर सरकारने त्वरित केंद्र सुरू करावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आमदार श्वेता महाले यांनी दिला.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार रायगडामध्ये दाखल