बुलडाणा - 2021 या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात अनेक घटना व घडामोडींच्या बातम्या लोकांच्या वाचण्यात आल्या. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तर बुलडाणा जिल्ह्यातील ( Buldana District Year Ender 2021 ) घटना लक्ष वेधत होत्या. मावळत्या वर्षातील महत्वाची दुर्दैवी घटना ( Important Events in the Year 2021 in Buldana District ) म्हणजे सिंदखेडराजा तालुक्यातील बीड जवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लोखंडी सळई भरुन घेऊन जाणाऱ्या टिप्परमध्ये अपघात झाला. यामध्ये 13 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तर चिखलीत जुन्या वादातून इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या त्यांच्या दुकानात घुसून करण्यात आली. सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली व या प्रकाराचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाले होते. याशिवाय स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सुरू केलेले अन्नत्याग आंदोलनाला मिळालेले हिंसक वळण या व अशा अन्य घटनांनी जिल्ह्यातील समाजमन ढवळून निघाले. अशा अनेक महत्त्वाच्या घटना व घडामोडींचा हा आढावा...
- समृद्धी महामार्गातील 13 मजुरांचा अपघातात मृत्यू - सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी डेपो तयार करण्यात आला आहे. डेपोतून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लोखंडी सळई भरुन व मजूरांना घेऊन जात होता. सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव जवळ सुरू असलेल्या समृद्धी महामार्गावर एसटी बसला साईड देताना टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला टिप्पर पलटी झाला. यावेळी टिप्परवर बसलेले 16 मजूर टिप्पर व सळईच्या खाली दबल्याने 8 मजूर जागीच ठार झाले. तर उपचारादरम्यान 5 मजुरांचा असे एकुण 13 मजुरांचा मृत्यू झाला होता.
- विष पिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू - राज्यभरात एसटी महामंडळाचे आंदोलन पार पडले. आंदोलनात खामगाव आगारातील साहाय्यक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मंगळवारी 16 नोव्हेंबरच्या रात्री विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना खांमगाव येथील सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान 'त्या' एसटी कर्मचाऱ्याची मृत्यूशी झुंज संपली व त्याचा गुरूवारी 18 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) असे असुन ते माटरगांव येथील रहिवासी होते.
- जुन्या वादातून झाले हत्याकांड - चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुकान मालक कमलेश पोपट (वय 55) यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह चिखली शहरात एकच खळबळ उडाली होती. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दरम्यान सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी राहुल किसन जायभाये (वय २३ रा. देऊळगांवमही ता. देऊळगांव राजा), राहुल अशोक बनसोडे (वय २० रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा), नामदेव पंढरीनाथ बोंगाणे (वय २० वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा) यांची तपासादरम्यान चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, यातील आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यापुर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थेटर घेण्यासाठी आला होताय होमथेटरच्या किंमतीवरुन त्यावेळेस आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले. आरोपीने मृतक पोपट यांनी आरोपीच्या आई-वडिलांवरुन शिव्या दिल्या होत्या. तसेच आरोपी राहुल जायभायेचे वडील एका महिन्यापुर्वी मयत झाले असुन कमलेश पोपट यांचा जुन्या घटनेचा राग डोक्यात ठेवुन त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचुन हत्या केली, अशी पोलिसांकडे प्राथमिक माहिती दिलेली आहे.
- रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन - सोयाबीनचे दर प्रति क्वि. 8 हजार रुपये व कापसाचा दर प्रति क्वि.12 हजार रुपये स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे 30% करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा, छोट्या व्यापाऱ्यांवरील स्टॉक लिमिट उठण्यात यावे, कापणी पश्चात नुकसानीच्या संदर्भातले तारखेचे घोळ न घालता महाराष्ट्राच्या कृषी खात्यानुसार विम्याची रक्कम मंजूर करावी आणि राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना हे. 50 हजार रुपये मदत तत्काळ द्यावी. तसेच कृषिपंपाचे वीज कनेक्शन कापणे थांबवावे, अशा मागण्या घेवून 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत तुपकरांनी नागपूर नंतर बुलडाण्यात घरासमोर सुरू केले. अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनात तुपकरांची प्रकृती ढासळल्याने आंदोलनाला हिसंक वळण मिळाले होते. दरम्यान डॉ. शिगणेंनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकरांच्या तब्बेतची विचारपूस केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुपकरांच्या मागण्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत 24 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक घेतली जाईल व केंद्राकडे मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केल्या जाईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोबाईलद्वारे केंद्र सरकारमधील शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या आहेत. त्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीने रविकांत तुपकर यांनी आंदोलनाला स्थगिती दिली.
- मेहकर न्यायालयाने दिला 20 दिवसातच वेगवान निकाल - देशातील किंवा राज्यातील कोणत्याही न्यायालयात कोणतीही याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेचा निकाल लागण्यासाठी शक्यतो वर्षानुवर्षे लोटल्याचे पाहायला मिळते. तसेच शिवाय जलद गतीच्या न्यायालयात देखील निर्णय लागण्यासाठी काही कालावधी लागतो. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर न्यायालयाने नांदण्यासाठी सासरी घेवून जात नसल्याने राजेश अर्जुन जाधव यांच्या पिडीत पत्नीने राजेशच्या व त्यांच्या सासरे कडील नातेवाईकांच्या विरोधात मेहकर प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात 2005 च्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याने पोटगीसाठी 2 जून 2021 रोजी दाखल याचिकेत प्रथम न्याय दंडाधिकारी एस.ए.सुरजूसे यांनी 2 जूनपासून 8 वेळा याचिकेची सुनावणी घेत 23 जून रोजी दाखल याचिकेचा निवडा केला. आरोपी राजेश अर्जुन जाधव याला त्याच्या 8 वर्षीय मुलीच्या शिक्षण व ऑनलाईन शिक्षणासाठी 1 लाख रुपये व घर भाड्यासाठी 5 हजार व अंतरिम पोटगी स्वरूपात पत्नीला 5 हजार रुपयाची दंडाची शिक्षा देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनावला. दंडाची रक्कम 15 दिवसाच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेशही देण्यात आले. एका दाखल याचिकेचा निवाडा चक्क 20 दिवसातच लावत ऐतिहासिक हा कदाचित पहिला निर्णय असेल.
- शेतकऱ्याच्या मुलाची सातासमुद्रपार भरारी - आपण नेहमीच म्हणतो की, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास. असाच काहीसा संघर्षमय इतिहासाचा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. शिक्षणाचा गंधही नसलेल्या गावचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत, संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी राजूची निवड झाली. राजू बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील रहिवाशी आहे. जगभरातील 160 देशातील एक हजार 350 विद्यार्थ्यांमधून राजूची निवड झालेली आहे.
- श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन - विदर्भाची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकर भाऊंची नि:स्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ज्ञ, नियोजन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ 4 ऑगस्ट रोजी अकाली विझला. शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे अत्यवस्थ झाली होती.
- अपार मिहिरची यशस्वी तिरंदाजी, भारताला मिळवून दिले सुवर्णपदक - ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भाला फेक स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ युरोपमधील पोलंडमध्ये 18 वर्षाखालील जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतचे आयोजन 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान केले होते. यामध्ये भारतीय युवा संघाचे तीन खेळाडू अंतिम फेरीत दाखल झाले होते. शनिवारी 14 ऑगस्ट रोजी त्यांची अमेरिकेच्या संघाची रोमहर्षक अंतिम लढत झाली आणि यामध्ये भारतीय संघाने अटी-तटीच्या फरकाने अमेरिकेवर मात मिळवली. अमेरिकेवर मात करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला पुन्हा भारताचा तिरंगा सातासमुद्रापार फडकवून भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवल्या गेली.
- सरपंचांचे जात प्रमाणपत्र खोटे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश - अनुसूचित जाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्राद्वारे सरपंच पद मिळवलेल्या धाड येथील सरपंच खातुनबी सय्यद गफार यांचे जात प्रमाणपत्र हे जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र बनविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. जात प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाला धक्का बसला. 2 सप्टेंबर रोजी जालना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निकाल दिलेला आहे.
- मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर अर्बन बँकेवर कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. यामुळे पुढील सहा महिने ग्राहक बँकेतून फक्त दहा हजार रुपयेच काढू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या बँकेचे अध्यक्ष भाजपा नेते व मलकापूर विधानसभेचे माजी आमदार चैनसुख संचेती हे असल्याकारणाने ते चर्चेत आले होते.