बुलडाणा- शहरातील अवैध रेती साठ्यावर बुलडाणा तहसील विभागातील महसूल विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील जुना गाव परिसर जवळील खुल्या जागेत १५ ते १६ ब्रास अवैध रेती साठ्यावर तहसील विभागातील महसूल विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री करण्यात आली होती. या धडक कारवाईमुळे रेती माफियांची धाबे दणाणले आहे.
नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करून शहरात ठिक-ठिकाणी रेतीची अवैध साठवणूक करण्यात आली आहे. असाच एक रेतीचा साठा जुनागाव परिसरातील खुल्या जागेवर असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांना मिळाली होती. त्यावरून जिल्हाधिकारी यांनी नायब तहसीलदार विद्या गौर, तलाठी गणेश देशमुख, तलाठी गोपाल राजपूत, चालक असमत खान अजमत खान, शिपाई नरेंद्र नांदे यांना जुना गाव परिसरात शनिवारी रात्री पाठविले.
पथकाने गाव परिसरातील खुल्या जागेत ठेवलेल्या १५ ते १६ ब्रास अवैध रेती साठ्यावर पंचनामा करून जप्तीची कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांच्या कारवाईमुळे शहरातील अवैध रेती साठवण करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, बांधकामावर रेतीचा साठा असल्यास त्याची महसूल कर्मचाऱ्यांकडून तपासणी होते का? याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा- 'या' मागण्यांसाठी बसपचे चिखली नगर पालिकेसमोर उपोषण