बुलडाणा - येथील शेगाव नगरपालिकेच्या मालकीचे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. ते कॉम्प्लेक्स सध्या जीर्ण अवस्थेत आहे. असे असतानाही पालिकेने या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर एका कंत्राटदाराला एलईडी स्क्रीन लावण्याचे कंत्राट दिले आहे. विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्सचे कुठल्याही प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही, तरीही पालिकेने हे त्यांना काम दिले आहे. शिवाय नगर रचना विभागाकडून योग्यता प्रमाणपत्रही न मिळवताच त्या कंत्राटदाराने सदर इमारतीवर खोदकाम केल्याने व्यापाऱ्यांनी स्वरक्षणासाठी ते बांधकाम गुरुवारी बंद पाडले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची तपासणी केली जाते. त्यानुसार दुरुस्ती लायक, जीर्ण, अतिजीर्ण यानुसार संबंधितांना नोटीस दिल्या जातात. तसेच ज्या इमारती धोकादायक आहेत, त्या इमारतीत राहणाऱ्यांना इमारत खाली करुन पाडण्याचे आदेशही दिले जातात. मात्र, शेगाव नगर पालिकेकडून अशी कारवाई आजपर्यंत झाली नाही. यामुळे शहरात जीर्ण इमारतीच्या संख्येत वाढ झाली आहे.
तरीसुद्धा या जीर्ण इमारतीवर मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्याच्या परवानग्या पालिकेने दिल्या आहेत. यामुळे इमारती मध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण केल्यामुळे गुरुवारी शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज न.प. कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांनी एलईडी स्क्रीन लावण्यासाठी सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. शिवाय नगर पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. कॉम्पलेक्समधील कोणत्याही सुविधा व जीर्ण झालेल्या इमारतींकडे पाहण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही.
मात्र, त्याच इमारतींवर अवैधरित्या खोदकाम आणि बांधकाम करण्यासाठी पालिका ठराव घेत आहे, ही बाब संताप जनक असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.