बुलडाणा - लोणार तालुक्यातील मातरखेड येथे, शासन स्थरावरून पिण्याच्या पाण्यासाठी काय उपाय योजना करण्यात आली? अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला ग्रामसेवकाने चक्क गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही, तर याच ग्रामसेवकाचा पिस्तूल घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
यासंदभार्त घाबरलेल्या ग्रामस्थाने मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी ग्रामसेवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. भाग्यवंत असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.
आपण पिण्याच्या पाण्यासंदर्भात काही तरी उपाय योजना करावी, अशी मागणी ग्रामसेवक भाग्यवंत यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी आपल्याला, 'मी डाॅन आहे, तुला गोळ्या घालून ठार करीन', अशी धमकी दिली, असा आरोप मधुकर सातपुते यांनी केला आहे.
मातरखेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाग्यवंत यांनी गावातील नागरिकांच्या समस्यांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते आणि ग्रामपंचायतीतील विकास योजनांबाबत गावातील ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यांनी आपल्या उर्मट वृत्तीप्रमाणे उडवा-उडवीची उत्तरे दिली. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाही, याबाबत मला काय विचारता? कुठे जायचे तिकडे जा, असे उत्तर त्यांनी ग्रामस्थांना दिले.
भाग्यवंत यांच्यावर कलम 506 आणि 507 नूसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ग्रामसेवकाचा हातात पिस्तूल घेऊन गाण्यावर थिरकतांनाचा व्हिडिओसुद्धा व्हाॅयरल झाला आहे. एवढेच नाही, तर त्याने त्याच्या व्हाट्सअपला हा व्हिडिओ स्टेटस म्हणूनही ठेवला होता.