बुलडाणा - खरीप हंगामात पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पात्र शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत पीक कर्ज देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण पीक कर्ज वाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही डॉ. शिंगणे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिंगणे बोलत होते. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, जि. प. अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, अॅड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना आणि पात्र सभासद शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने प्राधान्याने कर्ज द्यावे. कर्जमाफीचा पैसा पीक कर्जासाठी उपयोगात आणावा. कर्जमाफी झालेला आणि पात्र एकही सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये. बँकामध्ये पिक कर्ज वितरणासाठी सुरू असलेली दलालशाही थांबवावी. यामधून शेतकरी आर्थिक लुबाडणूकीस सामोरे जात आहे. बँकांनी त्यांच्याकडील सामान्य ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) अर्थात एकरकमी योजनेत त्यांच्या तरतूदीनुसार शेतकऱ्यांकडून व्याज माफ करीत मुद्दलच्या रक्कमेच्या तुलनेत 45 ते 55 टक्के वसूली करावी. उर्वरित कर्ज माफ करता येते. त्यानुसार बँकांनी यावर्षासाठी अशा प्रकारची योजना असल्यास त्याची माहिती पात्र शेतकऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे बँकांनी कटाक्षाने कुठल्याही योजनेचे आलेले खात्यातील पैसे कर्ज खात्यात वळते करू नये, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिल्या.
पीक कर्ज वाटप या बाबीला प्राधान्य देवून पात्र सभासद शेतकऱ्यांना 30 जुनपर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे, अशा यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.