बुलडाणा - वाढत्या कोरोनाचा प्रदूर्भाव लक्षात घेता विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. आजपासून (22 फेब्रुवारी) पुढील आदेशा येईपर्यंत मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला.
ई-पासच्या माध्यमातून दररोज हजारो भाविक घेत होते दर्शन -
राज्यात व बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. हे संक्रमण कमी करण्यासाठी शासन अनेक उपाय करत आहे. त्यामुळे ज्या नियमांना शिथिल करण्यात आले होते, त्या नियमांची पूर्वीप्रमाणे कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात संचारबंदी लावली असून, बाजार पेठेतील दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार शेगावचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. ऑनलाइन ई-पास काढून आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना -
कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने श्री संत गजानन महाराज मंदिर उघडे ठेवणे शक्य नाही. त्यामुळे अमरावती आयुक्त आणि बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार मंदिर प्रशासनाने मंदिर बंद केले आहे.
दरम्यान, पुणे, नाशिक या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावला असून अमरावती जिल्ह्यात एका आठवड्याचा लॉकडाऊन केला आहे. अमरावती सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत.