बुलडाणा - लोकशाहीत मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक आयोगाला जनजागृतीची मोठी कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील सलून चालकाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदान केल्याची बोटाला लागलेली शाई दाखवाा अन् मोफत दाढी कटिंग करून घ्या असा फलक सलून चालकाने दुकानाबाहेर लावला आहे. निवृत्ती मांजुळकर असे या सलून चालकाचे नाव आहे.
१८ एप्रिल रोजी लोकसभेसाठी बुलडाणा जिल्ह्यात मतदान होत आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असा फलक निवृत्ती मांजुळकर यांनी सलूनबाहेर लावला आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. याच निमित्ताने मांजुळकर यांनीही जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणजे बोटाला लागलेली शाई दाखवल्यास १८ तारखेला ते दिवसभर मोफत दाढी व कटिंग करून देणार आहेत. त्यामुळे परिसराच चर्चेचा विषय ठरला असून चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे.
मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना दाढी कटींगची सेवा देण्याचे ठरविल्याचे सलूनचे मालक निवृत्ती मांजुळकर यांनी सांगितले. या उपक्रमाने जास्तीत मतदान होईल, अशी खात्री वाटत असल्याचे बोरी आडगावचे ग्रामस्थ काशीराम वाघमारे यांनी सांगितले.