बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी माध्यमांसमोर याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणूकीतुनच माघार घेणार दिलीपकुमार सानंदा हे राज्यातील पहिलेच उमेदवार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसकडून तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी विधानसभा निवडणुकीतून अधिकृतरित्या माघार घेतली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून ईव्हीएमवर शंका व्यक्त करत आपण निवडणूक लढणार नसल्याचे कळवले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता; मात्र मी दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा सानंदा यांनी केला आहे.
हेही वाचा... बल्लारपूर मतदारसंघातून विश्वास झाडेंच्या उमेदवारीला स्थानिकांचा विरोध, बैठकीतून केला 'वॉक आउट'
ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीतच माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती; मात्र २८ सप्टेंबरला मुकुल वासनिक व बाळासाहेब थोरात यांना मी निर्णयावर ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन, तसेच दूरध्वनीवरूनही कळविले होते, असेही सानंदा म्हणाले आहेत. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले आहे, ज्यात या सगळ्याची कारणमिमांसा केली आहे.
तसे पाहता मागील आठवड्यात खामगावात त्यांनीच आयोजित केलेल्या मेळाव्यात गैरहजर राहून सानंदा यांनी तसे संकेत दिले होते. सानंदा हे निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे गेल्या आठवड्यातच समोर आले होते.मुलाच्या आजारपणामुळे त्यांना मुंबईला जावे लागले होते, असा त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता. तरी त्या निमित्ताने त्यांची निवडणूक न लढण्याची मानसिकता समोर आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा... 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'