बुलडाणा - आतापर्यंत आपण धर्म परिवर्तनाची अनेक कारणे ऐकली व पाहिली असतील, मात्र बुलडाण्याच्या धाडमधील एका महिलेचे धर्मपरिवर्तन कशासाठी करण्यात आले हे ऐकाल तर थक्क व्हाल. नुकत्याच झालेल्या सरपंच निवडणुकीत धाड सरपंचपदासाठी चक्क बनावट धर्मपरिवर्तन दाखवून मुस्लीम महिलेला अनुसूचित जागेवर सरपंचपद मिळवून घेतले आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
धाडच्या सरपंच झालेल्या खातून बी सैय्यद गफ्फार यांना पहिले अनुसूचित जातीची महिला दाखवून नंतर तिचा मुस्लीम धर्मात प्रवेश झाल्याचे दाखवत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जालन्यातून मिळविण्याचा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी वापरण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावटच असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शी उघड झाले आहे. प्रकरणी बुलडाणा आणि जालना जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी दोषींवर फसवणूक व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निवडणुकीच्या आधी व निवडणुकीच्या दिवशी बुलडाणा तहसीलदार यांना सांगितल्यावरही याच महिलेला अनुसूचित जागेवर राजकिय दबावाखाली सरपंच घोषित करण्यात आल्याचा तक्रारकर्त्यांकडून आरोप करण्यात आले आहे.
काय आहे प्रकार?
बुलडाणा तालुक्यातील चिखली विधानसभेमधील धाड ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्यसंख्या आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या ग्रामविकास पॅनलचे 9 सदस्य तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या सामाजिक एकता विकास आघाडीचे 8 सदस्य निवडून आले. त्यानंतर सरपंचपदासाठी धाड ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण निघाले. सरपंचपद आपल्याच पॅनलला मिळावे, यासाठी काँग्रेसच्या ग्रामविकास पॅनलमधील वार्ड क्र. 4च्या विजयी सदस्या सैय्यद खातून सैय्यद गफ्फार यांनी आपण पहिल्यांदा भारती बाबुराव लहाने असून अनुसूचित जात असून सैय्यद गफ्फार यांच्याशी लग्न केल्यानंतर माझे धर्मपरिवर्तन झाले. मी अनुसूचित जातीची महिला असल्याचे जालना जिल्ह्याचे जातीचे प्रमाणपत्र सरपंच निवडणुकीत सादर केले. हे जातीचे प्रमाणपत्र बनावट असून ते तयार करताना जोडण्यात आलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि शाळा सोडल्याचा उतारा हे बनावट असून जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून निवडणूक घ्यावी, अशी तक्रार 10 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी, तहसीलदार व सरपंचपदाच्या निवडणुकीत अभिजित तायडे, चंद्रकला अघाव, किरण सरोदे, विद्या गुजर, सबिहा खान टिका खान, नाजेमा नाज इम्रान, उषा बोर्डे व सावित्रीबाई बोर्डे या ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती. मात्र तरीही राजकीय दबावाखाली तहसीलदार रुपेश खंदारे यांनी त्यांना सरपंच घोषित केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
फौजदारी कारवाईची मागणी
जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणे व निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी या ग्रामपंचायत सदस्यांनी व प्रमोद भरत वाघुर्डे यांनी जिल्हाधिकारी जालना व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तक्रार दाखल करून सरपंचपद रिक्त करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाईची मागणी केली आहे.
शाळेची स्थापन 1985ची तर शाळा सोडल्याचा दाखला 1983चा
खातून बी सैय्यद गफ्फार यांनी काढलेल्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या कागदपत्रावरून असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे, की बाबुराव तुळशिराम लहाने यांची मुलगी भारती बाबुराव लहाने हिने धाड येथील सैयद गफार यांच्यासोबत विवाह करून त्या भारतीची खातून बी सैयद गफार झाल्या. भारती लहाने यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्या शाळेची कागदपत्रे जोडली आहेत, ज्यात त्यांची जात अनुसूचित सांगण्यात येत आहे. तसेच त्यांचा प्रवेश हा 23 जुलै 1983रोजी दाखविण्यात आलेला आहे. मुळात त्या ज्या शाळेचा दाखला देत आहेत त्या शाळेची स्थापना ही 1985मध्ये झालेली आहे. बाबुराव लहाने यांनी जालना तहसील पुरवठा विभाग येथून देण्यात आलेले रेशन कार्ड क्रमांक एसपी 496815 यावर भारती लहाने यांच्यासोबत अन्य पाच नावे दाखविण्यात आलेली आहेत. मुळात या क्रमांकाचे खरे रेशनकार्ड नसीम बी परवेज बाबला (रा. जालना) यांचे आहे. एवढेच नाही तर सदर महिलेने आपली जन्म तारीख 1 जानेवारी 1977 अशी सांगितली आहे व आपला निकाह हा सैयद गफ्फार यांच्यासोबत 1 एप्रिल 1966मध्ये झाल्याचा पुरावा दिला आहे. म्हणजे तिचा जन्म निकाह होण्याच्या 10 वर्ष 9 महिने आधीचा आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रानुसार समोर आली आहे. खातून बी सैय्यद गफार यांनी नामनिर्देशनमध्ये जोडलेल्या पॅनकार्डनुसार खातून बी यांचे वडील इब्राहीम खान असून ही खातून बी यांचे वडील बदलून बाबुराव लहाने कसा झाला, असा प्रश्न उपस्थित तक्रारकर्ता वाघुर्डे यांनी केला आहे.
ग्रामपंचायत सदस्याच्या मोबाइल नंबरचा वापर
अनुसूचित जातीच्या आधारे सरपंच झालेल्या खातून बी सैय्यद गफ्फार यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असून दाखल्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. तर खातून बी यांचा अनुसूचित जातीचा दाखला आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यासाठी 9970274232 या मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. हा मोबाइल नंबर धाड ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे रिजवान सौदागर यांचा असल्याची चर्चा आहे.
'बदनामी करण्याचा प्रकार'
अनुसूचित जातीचे दाखल केलेले प्रमाणपत्र हे बनावट आहे, की खरे हे न्यायालय ठरवेल. आमच्या पॅनलचे सैय्यद खातून बी हे सरपंच झालेले आहेत. त्यांची किंवा आमचे ग्रामविकास पॅनल बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया धाड येथील वार्ड क्र. 5च्या विजयी सदस्या वैशाली भावस्कर यांचे पती शरद बावस्कर यांनी दिली.