बुलडाणा - शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या पुढाकाराने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण जिल्ह्यात 'एक विद्यार्थी एक वृक्ष' ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरूवात आज रविवारी वृक्षपूजन व विद्यार्थ्यांना रोपटे देवून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपटे देण्यात आले. याप्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले.
या वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येणार आहे. यावेळी जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवंत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, चोपडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण डी. एस. पायघन, शिक्षणाधिकारी मुकुंद, एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन आदी उपस्थित होते.