बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते देशातील पहिले शहीद अग्निवीर आहेत.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले : अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी हवेत ३ राऊंड फायर करून शहीद अक्षय गवते यांना सलामी दिली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. यावेळी खासदार प्रतापराव जाधव हे देखील उपस्थित होते. इतर सैनिकांना ज्या प्रमाणे शासकीय सुविधा मिळतात, त्याच धर्तीवर शहीद अग्निवीर अक्षय गवते यांना सुविधा मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
हृदयविकाराचा झटका आला होता : अग्निवीर अक्षय गवते हे सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये तैनात होते. तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर त्यांना सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असताना २० ऑक्टोबरच्या रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. २३ ऑक्टोबरला सकाळी त्याचं पार्थिव पिंपळगाव सराई या मूळ गावी आणण्यात आलं.
गेल्या वर्षी अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल : अक्षय गवते हे ३० डिसेंबर २०२२ रोजी अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. अत्यंत खडतर अशा सियाचिन बॉर्डरवर त्यांची तैनाती होती. त्यांचे आई-वडील शेती करतात. ते त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होते. त्यांना एक लहान बहीणही आहे. अग्निवीर अक्षय गवते यांच्या निधनानंतर पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :