बुलडाणा - नऊ महिन्याच्या गर्भवतीला प्रसूतिकळा नसताना ही एका एमबीबीएस डॉक्टरने जबरदस्ती निर्दयपणे प्रसूति केली. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे घडली. हा प्रताप तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पतीने केल्याचा आरोप आसलगांव येथील संजय रामदास भोंगाळे यांनी केला आहे. डॉ. अविनाश पाटील या डॉक्टरावर कारवाईसाठी त्यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी संबधित डॉक्टरविरोधात कुठलीच कारवाई केली गेली नसून पीडित दाम्पत्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
डॉक्टरविरुद्ध आलेल्या तक्रारीची चौकशी जिल्हा शल्यचिकित्सक करत असतात. त्यांचा अहवाल आल्यानंतरच डॉक्टरावर कारवाई करण्यात येते. या प्रकरणात देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जळगांव जामोदचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.
कळा आल्यानंतरच वैद्यकीय नियमानुसार प्रसूती केली - डॉ. अविनाश पाटील
शारदा भोंगाळ या महिलेला प्रसूतीकळा येत असल्याने वैद्यकीय नियमानुसार प्रसूति केली आहे. मी कुठलेही चूक केली नसून मातेच्या पोटातच बाळाच्या नाळेला गाठ पडली होती, अशी प्रतिकिया यांनी दिली.
तक्रार प्राप्त होताच चौकशी केली जाईल - डॉ. प्रेमचंद पंडित
या घटनेची तक्रार माझ्यापर्यंत पीडित महिला किवा पोलिसांनी अद्यापपर्यंत दिली नाही. माझ्याकडे तक्रार प्राप्त होताच चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.