बुलडाणा - राज्यात सध्या सर्वत्र परतीचा पाऊस पडत आहे. यामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकत परतीची वाट धरली आहे. त्यामुळे शेगावच्या बाजारात रस्त्यांवर फुलांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे आता मुलांची दिवाळी कशी साजरी होणार? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दिवाळीच्या दिवशी झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सध्या ओल्या दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. बुलडाणा जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. ऐन दिवाळीत फुलाला भाव मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांवर भर पावसात रस्त्यावर फुले विकण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.
झेंडूची फुले खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात शहरात विकण्यासाठी आणले गेले. फुलांना ६० रुपये किलो भाव होता. मात्र, दिवाळीच्या दिवशी १० आणि ५ रुपये किलो भाव होता. तरीदेखील ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास १० क्विंटल फुले रस्त्यावर फेकली. फुले विक्रीसाठी आणताना जवळपास एका किलोमागे ४ ते ५ रुपयांचा खर्च होते आणि फुले विकून साधा १-२ रुपये देखील नफा मिळत नाही. त्यामुळे आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.