बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 मधील बाधित शेतकर्यांनी टोकाचे पाऊल उचलत आज शुक्रवारी (ता. 5 जानेवारी) धरणात उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होत असतानाच त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री महोदय इकडेही लक्ष द्या, असेच शेतकऱ्यांनी सुचवल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 मधील बाधित शेतकर्यांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारीपासून शेतकर्यांनी प्रकल्पस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, या उपोषणाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, शुक्रवारी पहाटेच पोलिसांनी अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलीस स्टेशनला आणल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आज शुक्रवारी (ता. 5 जानेवारी) धरणात उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री महोदय, इकडेही लक्ष द्या
खामगाव तालुक्यातील निमकवळा, काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 मधील बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्रकल्पात गेलेल्या फळबागा, शेतातील झाडे या व अन्य झालेल्या नुकसानाची भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता अधिकारी काणाडोळा करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे त्यांनी थेट निम्न ज्ञानगंगा धरणाच्या भिंतीवर 26 जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे. यात निमकवळा, काळेगाव आणि दिवठाना शिवारातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र, या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत ज्ञानगंगा धरणामध्येच उड्या घेऊन जलसमाधीचा प्रयत्न केला. या वेळी, पोलिसांनी शेतकऱ्यांना पाण्यामधून बाहेर काढले. जिल्ह्यात आज (शुक्रवार) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होत असतानाच शेतकऱ्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री महोदय इकडेही लक्ष द्या, असेच शेतकऱ्यांनी सुचवल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. पुणे-नगर महामार्गावर खोदकामात आढळला मानवी हाडांचा सापळा