बुलडाणा - १४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू-काश्मीर राज्यातील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील हुतात्मा जवान नितीन राठोड आणि संजयसिंग राजपूत यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाख रुपयांची मदत मिळाली होती. नंतर शासनाने २ ऑगस्ट २०१९ ला सदर मदत रक्कम वाढवून १ कोटी करण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, या वर्षी हुतात्मा जवानांची पुण्यतिथी निघून गेली, तरी देखील हुताम्यांच्या परिवारांना एक रुपया मिळाला नाही. 'ईटीव्ही भारत'ने या प्रकरणाची दखल घेतली. परिणामी, शासनाने हुतात्म्यांना त्वरित उर्वरित रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.
शासनाने मदत निधीतून उर्वरित ५० लाख रुपये देण्याचे निर्णय घेतले असून सुरुवातील प्रत्येक कुटुंबियांना १० लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहे. या १० लाख रुपयांमधून मलकापूर येथील हुतात्मा संजयसिंह राजपूत यांच्या पत्नीला ६ लाख आणि त्यांच्या आईला ४ लाख रुपये तर १० लाख रुपयांमधून लोणार तालुक्यातील चोरप्रांग्रा येथील हुतात्मा नितीन राठोड यांच्या पत्नीला ६ लाख, तर त्यांच्या आई आणि वडिलांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहेत. उर्वरित ४० लाख रुपये देण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असा शासन निर्णय २ मार्च २०२० रोजी हुतात्मा नितीन राठोड आणि संजयसिंह राजपूत यांच्या नावाने काढण्यात आला आहे. सदर मदत निधी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मार्फत वितरित करण्यात येणार आहे. शासनाने हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना उर्वरित ५० लाख रुपये देण्याबाबत निर्णय घेतला. याबाबत हुतात्मा नितीन राठोड यांचे भाऊ प्रवीण राठोड यांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार व्यक्त केले. मात्र, सरकारने पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, ५ एकर जमीन आणि हुतात्म्यांचे स्मारक असे शासनाकडून आश्वासन देण्यात आले आहे, ते देखील पूर्ण करावे, अशी विनंती प्रवीण राठोड यांनी केली आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: दोनशे उठबश्या प्रकरणात शिक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश