बुलडाणा - येथील स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाईकाजवळून रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्यासाठी पैसे घेणाऱ्या कक्षसेवकाला कार्यमुक्त करण्यात आले. सागर जाधव असे या कक्षसेवकाचे नाव आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका आदेशाने त्याला सेवेतून कार्यमुक्त केले आहे. महिलेला रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्यासाठी पैसे मागितल्याबाबत महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर तक्रार केली होती. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने 9 ऑक्टोबरला याबाबत बातमी प्रकाशित केली होती.
लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील 54 वर्षीय महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 4 ऑक्टोबरला त्यांना येथील स्त्री रुग्णालयच्या डेडिकेट कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आली होती. यानंतर या महिलेला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. 5 ऑक्टोबरला अतिदक्षता कक्षात कंत्राटी तत्वावर कार्यरत सागर जाधव (रा.हतेडी) याने महिला रुग्णाच्या नातेवाईकाला तुमच्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन लावणे गरजेचे आहे, हा इंजेक्शन लावल्याने रुग्ण बरे होतात, असे सांगून विश्वासात घेतले. तसेच त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले. नंतर 6 ऑक्टोबरलाही पुन्हा इंजेक्शन लावायचे आहे म्हणत पुन्हा 5 हजार रुपयांसह एकूण 10 हजार रुपये घेतले.
मात्र, 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. सकाळी नातेवाईक रूग्णालयात आले व त्यांनी या घटनेची माहिती कोविड रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना दिली. यानंतर डॉ. वासेकर यांनी प्रकरणाची तत्काळ दखल घेत ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांना सांगितली. डॉ. घोलप यांनी यांनी याप्रकरणी 5 सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. तसेच 'ईटीव्ही भारत'ने 9 ऑक्टोबरला याबाबत बातमी प्रकाशित केली होती. याबातमीची दखल घेत समितीने केलेल्या चौकशीत सागर जाधव दोषी आढळला. त्याला जिल्हा शल्यचिकित्सकांनी सेवेतून कार्यमुक्त केले.