बुलडाणा - जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. आतापर्यंत 11 लाख 19 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 9 दारुच्या दुकानांना 31 ऑक्टोबरपर्यंत सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'ईडी'ची पीडा आता प्रफुल पटेल यांच्यामागे, म्हणाले नोटीस हातात आल्यास चौकशीलाही सामोरे जाऊ
राज्यात 21 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागली आहे. या काळात आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलडाणा जिल्ह्यात अवैध दारू कलमान्वये 140 गुन्हे दाखल केले आहे. त्यामध्ये 125 आरोपी अटक करण्यात आले आहेत. हातभट्टी दारू 493 लिटर, देशी दारू 683 लिटर, फॉरेन लिकर 11 लिटर, बियर 10 लिटर, बाहेरील राज्यातील परदेशी दारु जळगाव जामोद येथे 9 लिटर जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईत 9 वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा एकूण मुद्देमाल 11 लाख 19 हजार 574 रुपयांचा आहे.
जिल्ह्यातील चार दुकानांना 31 ऑक्टोबरपर्यंत सील ठोकण्यात आले आहे. विशेष म्हणजे नांदुरा येथील बिअर शॉपी एक्सपायर झालेल्या बीअरची विक्री करत होते. त्यालाही 31 ऑक्टोबरपर्यंत सील करण्यात आले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, नागपूर विभागाचे उप आयुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा अधिक्षक बी.व्ही. पटारे यांच्या आदेशाने पीआय नितीन शिंगणे, पीआय दीपक शेवाळे, पीआय गणेश गावंडे यांनी कारवाई केली आहे.