बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल 10 महिने आधी उचलले असते तर 700 शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या परिवारांना एक-एक कोटी रुपये मदत द्यावी, या परखड शब्दांत डॉ. प्रविण तोगडिया (Dr Pravin Togadia) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली. ते आज (8 डिसेंबर) बुलडाणा येथे आले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या (AntarRashtriya Hindu Parishad) संबोधन कार्यक्रमामध्ये बोलत होते.
- तोगडियांची पंतप्रधान मोदींवर टीका -
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदद्वारे आयोजित कार्यक्रमात तोगडिया प्रखर हिंदुत्वावर बोलत होते. तोगडिया म्हणाले की, कृषी कायदे लवकर परत घेतले असते तर 700 आया-बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसले नसते. म्हणून या परिवारांना केवळ 700 कोटींची मदत देणे खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तत्काळ मदत करावी, अशी आग्रही मागणीसुद्धा तोगडिया यांनी केली. तर मुस्लिमांच्या नमाजलासुद्धा तोगडिया यांनी प्रखर विरोध केला आहे. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करू नये, त्यांनी त्यांची नमाज मशीदमध्ये करावी, किंवा त्यांच्या घरात करावी, असेही मत प्रविण तोगडिया यांनी व्यक्त केले.