बुलडाणा - जिल्ह्यातील डोंडगाव येथील डॉक्टर संजय धारकर यांच्यावर गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणे, सोनोग्राफी करणाऱ्या रुग्णांच्या कागदपत्रांशी छेडछाड करणे याप्रकरणी धारकर यांना तीन गुन्ह्यात प्रत्येकी 11 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सोबतच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. मेहकर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 2018 मध्ये डॉ.धारकर यांच्या दत्तात्रय रुग्णालय व सोनोग्राफी सेंटरवर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक स्वाती रावते आणि तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्या पथकाने छापा मारला होता. यावेळी शासनाच्या नियमानुसार ठेवण्यात येणाऱ्या कागदापत्रांमध्ये अनियमितता आढळल्याने कारवाई केली होती. डोंडगाव येथील दत्तात्रय रुग्णालय व सिंधू मॅटर्निटी होम येथे अवैध गर्भपात होत असल्याच्या तक्रारी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक स्वाती रावते यांना प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने डॉक्टर संजय धारकर यांच्या रुग्णालय व सोनोग्राफी सेंटरवर छापा टाकण्यात आला होता.
तपासणीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे कोणतेही रेकॉर्ड आढळून न आल्याने तसेच बोगस कागदपत्रे असे अनेक पुरावे समोर आले होते. यानंतर संजय धारकर यांच्या सोनोग्राफी सेंटरला सील करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी अभिवक्ता रुपाली खन्ना यांनी युक्तिवाद केला. सध्याचे व माजी जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक स्वाती रावते व तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी डॉक्टर संजय धारकर यांच्याविरुद्ध प्रसूती पूर्व गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंध कायदा 1994 च्या कलम 23 ,3 (1)4 (1 )आणि 18( 1 )अन्वये निर्णय दिला.