बुलडाणा : निंदनीय विकृतीची संतापजनक घटना बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील एका गावातील एका पतीने त्याच्या पत्नीचे सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून बदनामी केली आहे. या प्रकरणी संबंधित पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
याविषयी पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, चिखली तालुक्यातील अंचरवाडी या गावातील एका महिलेचा देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या वर्षी 30 जून रोजी विवाह झाला होता. मात्र तो सातत्याने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे ही महिला दिवाळीपासून माहेरीच राहत होती. यानंतर या व्यक्तीने घटस्फोटासाठी महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी पोस्टर लावून बदनामी करेन अशी धमकी त्याने दिली. तसेच महिलेचा फोटो आणि बदनामीकारक मजकूर असलेले पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावले.
भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी संबंधित विकृताविरोधात कलम 507 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर सगळीकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी होताना दिसत आहे.
हेही वाचा - बारामतीत महिलेच्या गळ्याला सुरा लावून घरातील रोख रकमेसह दागिने केले लंपास