बुलडाणा - जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारी आजाराच्या संकटाने सगळ्यांच क्षेत्रात आर्थिक फटका बसला आहे. मात्र, देशाचा आर्थिक पाया असलेल्या बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसला नसल्याचे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ठेवी आल्या नसल्याने व वाटलेल्या कर्ज प्रकरणात थकीतचे प्रमाण वाढल्याने बँका आणि पतसंस्था यांच्या नफ्यात घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, अनलॉक झाल्यापासून सध्या बँकिंग क्षेत्रातील बँका आणि पतसंस्था सुरळीत मार्गावर येत असल्याचे दिसत आहे.
कोरोना काळातील बँकिंग क्षेत्रातील स्थिती -
कोरोना या महामारीच्या संकटामुळे देशात 24 मार्चपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अनेक उद्योगधंदे बंद होते. व्यापार बंद होता. लग्न व मोठे समारंभ घेण्यात येत नव्हते. या शिवाय अनेकांच्या हाताला काम नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती नाजूक या काळात झाली होती. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व व्यवसाय यांना मुभा देण्यात आली होती. व्यवसाय तर सुरू होते, मात्र नागरिक बाहेर न आल्याने सुरू असलेले व्यवसाय यांना ही आर्थिक चणचण भासली. अत्यावश्यक सेवेत प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील बँका आणि पतसंस्था यांचा देखील समावेश होता. मात्र, या क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला नसून, बँकांना भविष्यात याचा धोका नसल्याचे मत सेंट्रल अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी व्यक्त केले आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि सरकारने खातेदारांना व कर्जदारांना मदत केल्याचा हा परिणाम आहे.
दरम्यान, कोरोनामूळे लॉकडाऊन काळात पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींवर व्याज सुरू असल्याने व नवीन ठेवी आली नसल्याने पतसंस्थेला नफा झालेला नाही. तसेच दिलेल्या कर्जात कर्ज भरणा थांबल्याने अनेक कर्ज प्रकरण थकीत असल्याने पतसंस्थेचे नुकसान झाले आहे.
अनलॉकमध्ये काही प्रमाणात व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र, अर्थव्यवस्था सुरळीत झाली असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी काही काळ लागेल, असे मत आशिया खंडातील एकमेव सर्वात मोठी असलेली पतसंस्था बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केले. बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात 467 शाखा व 350 च्या वर शेतकऱ्यांचे गोदाम असून , 9 हजार 92 कोटी रुपयांचे ठेवीदार असून 6 हजार 332 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. या पतसंस्थेमध्ये एकूण 7 हजार 500 अधिकारी-कर्मचारी आपली सेवा बजवत आहेत. तर लॉकडाऊन काळात ठेवीदारांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे. आजही ठेवी संस्थेच्या वाढत आहेत. मात्र, त्यावेळी कर्जदार कमी झाले होते. पहिले मोठे कर्जदार भेटत होते. आत्ता लहान कर्जदार मिळत असून, लॉकडाऊन काळात कर्जप्रकरण थकीत झाले असून मला अभिमान आहे की मी सहकार क्षेत्रात काम करतो. कारण कोरोनाच्या काळात सहकार क्षेत्रातील एकाही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला कोरोनामुळे नोकरीवरून कमी करण्यात आले नाही. आम्हीही आमच्या पतसंस्थांमधील एकही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला नोकरीवरून कमी केले नाही. विशेष म्हणजे सगळ्यांना वेळेवर पगार दिल्याचे मत बुलडाण्याच्या राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 25 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करणार
राजर्षी शाहू ग्रामीण पतसंसंस्थेच्या 8 शाखा आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेट पतसंसंस्थेच्या 22 अशा एकूण 30 शाखा जिल्ह्यात व जिल्हाबाहेर कार्यरत असून, 10 धान्य गोदाम शेतकऱ्यांसाठी बांधलेले आहेत. यामधून 500 कोटी रुपयांचे व्यवहार चालवत असून यामध्ये 282 कोटींची ठेवी व 179 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जवळपास 130 अधिकारी-कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांच्या मतानुसार सध्या बँकिंग व्यवहार सुरळीत झाल्याचे समोर येत आहे. मात्र, बँकिंग क्षेत्राची अर्थव्यवस्था सुरळीत झाल्याचे म्हणता येणार नाही.
आरबीआय आणि शासनाच्या मदतीमुळे बँकिंग क्षेत्राला कोरोनाचा फटका नाही-
कोरोनाचा पूर्ण विश्वाला बसला आहे. परंतु, आपल्या देशातील बँकिंग सेक्टरला खूप मोठा असा परिणाम झालेला नाही. कारण आरबीआय आणि शासनाने बँकेच्या कर्जदारांना खूप सारी सवलती दिल्या होत्या. कर्ज फेडसाठी कर्जदारांना 6 महिन्याची मुदत वाढवून दिली होती. जे अन्य खातेदार होते त्यांच्यासाठी शासनाने आत्मनिर्भर योजने अंतर्गत 30 टक्के त्यांचे कर्ज वाढवून दिले होते. त्यामुळे लोकांनाही त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि तो सुदृढपणे चालविण्यासाठी मदत झाली आणि कर्ज भरण्यासाठी 6 महिन्याचा जो काळ वाढवून दिला त्यामुळे बँक सेक्टरवर भार पडलेला नाही. अनलॉक सुरू झाल्यापासून बँक सुरळीत सुरू आहेत. नवीन ठेवी पण येत आहेत व कर्ज वितरणाचे प्रमाण बऱ्याप्रमाणे वाढले आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरला विशेष धोका झाल्याचे सध्या तरी दिसत नाही. भविष्यातही असा विशेष परिणाम होईल असे काही जाणवत नाही, असे मत सेंट्रल अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी व्यक्त केले आहे.
'पैशाचे चलन चांगले झालेले आहे. पण अर्थव्यवस्था पूर्व पदावर आली असे म्हणता येणार नाही'
कोरोना काळामध्ये अर्थव्यवस्था ही कठीण परिस्थितीत आलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे उत्पन्न काहीच नव्हतं. त्यामुळे आमच्या पतसंस्थेच्या कर्ज प्रकरणात थकीतचे प्रमाण वाढले आहे. सोबतच खर्च काही नसल्यामुळे लग्न समारंभ किंवा इतर समारंभ होत नसल्यामुळे बचत देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आता ठेवीचे प्रमाण वाढायला लागली आहे. एक प्रकारचा पॅराडॉक्सिकल इन्व्हरमेंट जिथं ठेवी वाढते पण कर्ज वाढत नाही. यामुळे संस्थेचा नफा काही प्रमाणात यावेळेस कमी होणार आहे. जर आकड्यांमध्ये सांगायचे झाले तर आज बुलडाणा अर्बनची ठेवीची वाढ ही जवळपास 7 ते 8 टक्क्यांनी झालेली आहे. कर्जाची वाढ 2 ते 3 टक्क्यांनी झालेली आहे. ज्याच्यामुळे हा 5 टक्क्यांचा गॅपवर जी ठेवीदारांना आम्हाला जो व्याज द्यायचा आहे त्यांच्यामुळे नफ्यावर विपरीत परिणाम या माध्यमाने होणार आहे. पण, आता मागच्या महिन्यांपासून प्रगतीवर आहे. काही प्रमाणात पैशाचे चलन देखील चांगले झालेले आहे. पण म्हणावं तसा किंवा अर्थव्यवस्था पूर्व पदावर आली असं म्हणता येणार नाही, असे मत बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केले.
कोरोनानंतर पतसंस्थेला छोटे कर्जदार मिळत आहेत -
कोरोना काळामध्ये ठेवींचा प्रवाह फार चांगल्या पद्धतीने होता. आजही संस्थेच्या ठेवी वाढत आहेत. परंतु, तेव्हा कर्जाचे प्रमाण नगण्य किंवा नसल्यासारखा झाला होता. आज कर्जदार संस्थेला मिळत आहे मात्र फरक एवढा आहे की, पूर्वी मोठे कर्जदार संस्थेला मिळायचे. परंतु, कोरोनानंतरची परिस्थिती निर्माण झाली की, अनेक लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करावा या भावनेतून अनेक छोटे-छोटे व्यवसाय आपल्या जिल्ह्यामध्ये उभे राहत आहे. असे छोटे व्यवसायिक कर्जदार संस्थेकडे येत आहेत. त्यामाध्यमातून रोजगार जिल्ह्यात उपलब्ध होत आहेत. कोरोना काळामध्ये संस्थेने चांगल्या पद्धतीची सेवा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा लोक संस्थेमध्ये येवू शकत नव्हते तेव्हा घरपोच पैसे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिले. या काळामध्ये आपण कुठल्याही कर्मचाऱ्याची पगार कपात केली नाही. किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला सुद्धा कामावरून कमी केलेला नाही. कोरोना काळातील देशची परिस्थिती आपण पाहिली आहे. मला सहकार क्षेत्राचा अभिमान वाटतो. या क्षेत्रात कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेला नाही. या सहकार क्षेत्रातील एकाही व्यक्तीचा रोजगार कोरोना काळामध्ये हिरावला गेलेला नाही. ठेवी आणि कर्जाच्या प्रकरणात कर्ज थकीत झालेले आहे. परंतु, संस्था जास्तीतजास्त ग्रामीण भागात कार्यरत असल्यामुळे दोन महिण्यात संस्थेची कर्ज वसुली पाहायला मिळेल , असे मत राजर्षी शाहू ग्रामीण पतसंसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले आहे.