बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आहे. या शाळेतील शौचालयाची साफसफाई ही स्थानिक प्रशासनाने एक आठ वर्षाच्या चिमुकल्याकडून करून घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची तीन दिवसानंतर गंभीर दखल घेत यातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रथम दर्शनी व्हायरल व्हिडीओ मधील ग्रामपंचायत कर्मचारी याला जिल्हाधिकाऱ्यांनी तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मारोड येथील प्राथमिक शाळेचे संबंधित मुख्याध्यापक व दोषी शिक्षकाला तात्काळ निलंबित करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
जिल्ह्यातील गृहविलगीकरण बंद करून प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासनाने विलगीकरण कक्षाची निर्मिती करावी आणि त्या ठिकाणी लक्षणें नसलेल्या कोरोणा बाधित रुग्णांना भरती करावे असे आदेश जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी दिले आहेत, त्या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावांमध्ये विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी 15 कोरोना बाधित रुग्ण भरती करण्यात आले आहेत. या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्याचा जिल्हाधिकारी यांचा 28 मे रोजी दौरा आयोजित असल्याने जिल्हाधिकारी आपल्या शाळेतील कोरोना बाधितांच्या विलगीकरण सेंटरला भेट देवू शकता म्हणून एका लहान मुलाकडून शौचालयची साफसफाई केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.
हेही वाचा - रुग्ण सेवेचे व्रत! इथे होतो अवघ्या 10 रुपयात कोरोना रुग्णावर उपचार
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कर्मचारी तातडीने निलंबित -
हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित केल्याचे सांगितले आहे. तर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्याध्यापक व दोषी शिक्षक निलंबीत -
या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये मारोड येथील प्राथमिक शाळेचे संबंधित मुख्याध्यापक व दोषी शिक्षकाला तात्काळ निलंबित करून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली दखल-
या प्रकरणाची दखल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली असून त्यांनी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी बुलडाणा पालकमंत्र्यांकडे केली आहे.
हेही वाचा - बाबो! एक दोन नाही तर या महिलेने दिला तीन बाळांना जन्म