बुलडाणा - जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश गावांचे हाल झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलेला आहे. तर, नागपूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील बुलडाणा-चिखली, शेगाव-अकोला, बुलडाणा-अजिंठा आदी मार्ग बंद पडले आहेत. पुरामुळे खामगाव तालुक्यात येणाऱ्या दिवठाणा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला असून जवळच्या ज्ञानगंगा प्रकल्पातील सांडव्याचे पाणी गावात घुसल्याने गावकऱ्यांना रात्रभर गावाबाहेर उभे राहावे लागले. तर, सकाळपर्यंत या गावात शासकीय मदत पोहोचलेली नसल्यामुळे. गावात जनावरांसह हजाराच्यावर नागरिक अडकून पडले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलाच कहर केला आहे. येथील खामगाव तालुक्यातील दिवठाणा आणि पोराज गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे तालुक्यात प्रवेशासाठी असलेला एकमेव पुलाचा रस्ताच पाण्याखाली गेला असून गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसले आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी दिवठाणा या गावाचे काळेगाव फाट्या नजीक पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, शासनाकडून जागेच मोबदला आणी पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा नागरिकांना न पुरविण्यात आल्याने दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गाव सोडले नाही. यातच येथील सरपंच सुभाष वाकुडकर यांनी काही दिवसांपूर्वी गावात सांडव्याचे पाणी घुसेल यासाठी योग्य उपाय योजना करण्याबाबत शासनाला कळविले होते. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने रात्री या गावावर संकट कोसळले.
हेही वाचा - खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे उघडले, नागपूर-पुणे महामार्ग बंद
या गावात हजाराच्यावर नागरिक आणि शकडो जनावरे अडकून पडली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मात्र, या गावात शासनाची कुठलीही मदत पोहोचली नाही. अशीच स्थिती तालुक्यातील पोराज गावाची आहे, या गावाचाही तालुक्याशी संपर्क सध्या तुटलेला आहे. पावसामुळे ज्ञानगंगा प्रकल्पाने धोक्याची पातळी गाठली असून येथील सांडवा सुरू आहे. एकंदरीत तालुक्यात उडालेल्या पावसाच्या हाहाकाराने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून, घरांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी गेल्या पुरात वाहून