बुलडाणा - अप्पर वर्धा धरणातून सोडलेले पाणी काही तासांत बंद करण्यात आले. हे पाणी बंद करणाऱ्या अभियंत्यासह दबाव आणणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. ते बुलडाणा जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले असता, माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी वर्धा नदीला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तिवसा, धामणगावसह अनेक गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता सुटणार होता. मात्र श्रेयवादातून भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव आणत सोडलेले पाणी चार तासांत बंद केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पाणी बंद करणाऱ्या संबंधित अभियंता व भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
यावेळी माजी मंत्री वसंत पुरके, रणजित कांबळे, आमदार राहुल बोन्द्रे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.