बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात सध्या सर्वच पक्षांमध्ये गटा-तटाचे राजकारण सुरू आहे. काही पक्षांना बंडखोरांचे ग्रहण लागले आहे. काही पक्ष हे ग्रहण शांत करण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, आपल्या पसंतीच्या उमेदवाराला तिकीट मिळाले नाही, या कारणावरून अनेक भागांमध्ये कार्यकर्ते नाराज आहेत. याच प्रकारातून काल संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांना सभेत खडे बोल सुनावले.
एवढेच नाही तर आपण दलाली करून पैसे घेऊन जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात तिकीट दिल्याचा आरोप केला. यावेळी अश्लील भाषेत घोषणाही देण्यात आल्या. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - विकासकामांचे फक्त फलकच... अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी इच्छुक होती. तर यावेळेस भारिप बहुजन महासंघामधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेते प्रसेनजीत पाटील यांच्यासह डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, रमेश घोलप आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. अशा वेळेस प्रसेनजीत पाटील आणि स्वाती वाकेकर यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी डॉ. वाकेकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.
मंगळवारी सायंकाळी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावामध्ये वाकेकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांसह परिसरातील नेते व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते. यावेळी बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांना प्रसेनजित पाटील यांच्या कापलेल्या उमेदवारी प्रश्न केले. यावेळी अंभोरे यांनी कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आणखी भडकले.
हेही वाचा - भाजप आमदार फुंडकरांच्या आदर्श गावाची दयनीय अवस्था; आतापर्यंत 'भोपळा' विकास
अंभोरे यांनी पैसे उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अंभोरे यांनी बैठक आटपून काढता पाय घेत असतानाच कार्यकर्त्यांनी अंभोरे यांच्यासमक्ष अश्लिल नारेबाजी करत त्यांना शिवीगाळ केली कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता फेसबुकवर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याच्या पोस्ट टाकल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.