बुलडाणा : राज्यात सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. तिरुपती बालाजी संस्थानच्या वतीने 6 एप्रिल 2023 रोजी नांदुरा येथे हनुमान जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सचिवालयाने बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या हस्ते जलाभिषेक : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात जगातील सर्वात उंच 105 फूट हनुमान मूर्तीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जलाभिषेक करण्यात येणार आहे. यंदाच्या हनुमान जयंतीला या सर्वात उंच हनुमान मूर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत पार पडणार आहे. त्यासाठी नांदुरा येथील बालाजी संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
विविध सामाजिक उपक्रम : 6 एप्रिलला होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजेरी लावणार असून विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री हे आयोजित केलेल्या धार्मिक सभेला देखील संबोधित करणार आहेत. तसेच संस्थानाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१०५ फूट उंचीची भव्य हनुमान मूर्ती : या संस्थानच्यावतीने मोहनराव नारायणा नेत्रालय चालविले जाते. या नेत्रालयाच्या माध्यमातून अतिशय अल्पदरात नेत्रशस्त्रक्रिया केल्या जातात. याच संस्थानच्या माध्यमातून नांदुरा येथे मलकापूर रोडवर १०५ फूट उंचीची भव्य अशी हनुमान मूर्ती बसविण्यात आली आहे. ६ एप्रिल २०२३ रोजी नांदुरा येथे बालाजी संस्थानच्यावतीने हनुमान जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे अशी आयोजकांनी दिली आहे. बुलडाण्यातील नांदुरा गावाला 2001 मध्ये एक नवी ओळख मिळाली आहे. नांदूरा गावात जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती आहे.