बुलडाणा - मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांमधील परिचितांना रुग्णालयातील कर्मचारी टोकन देऊन टोकनची हेराफेरी करत असल्याचे आढळून आले. यानंतर उपस्थित नगारिकांना राग अनावर होऊन त्यांनी टोकन देऊन हेराफेरी करणाऱ्या सोळंके नामक कर्मचाऱ्याला चोप दिला. ही घटना 13 मे रोजी सकाळी घडली.
आता लसीकरणाला देखील सेटिंग केल्याचे समोर-
कोरोना पासून जीव वाचवण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय असल्याने नागरिक प्रत्येकच लसीकरण केंद्रावर आता गर्दी करतांना दिसत आहेत. अशातच मलकापूर येथील लसीकरण केंद्रावर शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन लसीकरणासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी नागरिकांकडून सर्रासपणे संचारबंदीचे उल्लंघन होतांना देखील दिसून आले. लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या, रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारानंतर आता लसीकरणाला देखील सेटिंग केल्या जात असल्याचे समोर येत आहे. केंद्रावरील उपस्थित कर्मचारी हा मर्जीतील काही लोकांना टोकन देऊन लसीकरणासाठी पाठवत असल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत या कर्मचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसात कुठलीच तक्रार दाखल झालेली नाही.