बुलडाणा - मराठी पत्रकार परिषदेच्या घोषणेनुसार बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी मराठी पत्रकार परिषदचा वर्धापन दिन विजय दिवस म्हणून साजरा केला. पत्रकार संरक्षण कायदा संमत झाल्याचा आनंदोत्सव म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी फटके फोडून पेढे वाटण्यात आले.
पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा, यासाठी गेल्या १५ वर्षांपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शासनासोबत संघर्ष सूरू आहे. यासाठी संघटनेने विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने झालीत. संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात हा 'विजय दिन' बुलडाणा जिल्ह्यात साजरा झाला. संघटनेच्या पत्रकारांनी पत्रकार भवनासमोर एकत्रीत येवून हा आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, प्रदेश प्रतिनिधी अरूण जैन, पत्रकार भवन समितीचे अध्यक्ष नितीन शिरसाट, वसीम शेख,गजानन धांडे, रणजीतसिंग राजपूत, संदीप चव्हाण, बुलडाणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय जट्टे, नितीन कानडजे, पवन चवरे, भानुदास लकडे, प्रवीण थोरात, संदीप वंत्रोले, सुजीत राजपूत, निलेश राऊत, रविकिरण टाकळकर आदी यावेळी उपस्थित होते.
सर्व पत्रकारांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या शासन निर्यणाची प्रत अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पखाले यांना सादर केली. यावेळी श्री. पखाले यांनी शासन निर्णयाची प्रत जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याला पाठवून योग्य ती अंमलबजावणी करण्याबाबतच्या सुचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले. या ठिकाणी रणजीत राजपूत यांनी प्रास्ताविक करून पत्रकार संघाचा संरक्षण कायद्यासाठी संघर्ष आणि त्याची फलश्रृती पर्यंतचा प्रवास वर्णन केला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दिलीप तडवी उपस्थित होते.