बुलडाणा - यवतमाळच्या टिपेश्वरमधून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचलेला सी-वन नावाचा पट्टेदार वाघ नुकताच वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे वन्यजीव विभाग सतर्क झाला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव परिक्षेत्रात सध्या या वाघाचे वास्तव्य असल्याने त्या वाघाच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात १ डिसेंबर पासून सी-१ नावाचा वाघ आला आहे. या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वन्यजीव विभाग लक्ष ठेवून आहे. काल वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात खामगाव वन्यजीव परीक्षेत्रात वाघाचे दर्शन झाले आहे. रेडिओ कॉलर लावलेला हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभ्यारण्यातून ५ महिन्यात १३०० किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचलेला आहे. खामगाव वन परीक्षत्र हे अकोला वन्यजीव विभागा अंतर्गत येत असल्याने हा विभाग सतर्क झालेला असून आवश्यक ती पावले उचलली जात आहे. सी-१ वाघाच्या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यातील व्याघ्र समितीची बैठक नुकतीच पार पडली. सी-१ वाघाच्या शोधार्थ ज्ञानगंगा अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे वाढविण्यात आले होते.
रेडियो कॉलरने वाघाचा पाठलाग सुरू होता. आता त्याचे छायाचित्र हाती आल्यानंतर वन्यजीव विभाग अजून सतर्क झाला आहे. बुलडाणा जिल्हा व्याघ्र समितीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. त्यात रात्रीच्या वेळी खामगाव- बुलडाणा हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या आगमनाने ज्ञानगंगा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाघांच्या स्थलांतराचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे बुलडाण्यात आलेल्या या वाघाने प्रकर्षाने नैसर्गिक प्रवृत्तीनुसार मानवी संघर्ष टाळला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात एका गुराला ठार केल्याची घटना वगळता अन्यत्र मानवी संघर्ष या वाघाने टाळला आहे. विशेष म्हणजे हिंगोलीतील अपवाद वगळता हा वाघ पाच जिल्ह्यात कोणाच्या नजरेसही पडला नाही. अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेसह वाघ हा प्राणी राहण्यास अनुकूल वातावरण आहे. तसेच वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हा वाघ ज्ञानगंगेत राहू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.