बुलडाणा : राज्य सरकारने नुकताच शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार 2021 - 22 जाहीर केला. बुलडाण्याची व्हीलचेअर तलवारबाज खेळाडू अनुराधा सोळंकीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराने बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
व्हीलचेअर तलवारबाजीत नैपुण्य साध्य केले : बुलडाणा जिल्ह्यात पुरवठा विभागात कार्यरत असलेली दिव्यांग महिला अनुराधा सोळंकी हिला आपल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. याच जिद्द आणि हिमतीच्या जोरावर तिने व्हीलचेअर तलवारबाजीत नैपुण्य साध्य केले. तिला मिळालेल्या या पुरस्काराने आता तिचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
सरकारी नोकरीवरच न थांबण्याचा निर्धार : अनुराधा लहानपणापासूनच जिद्दी आहे. ती लहान असतानाच तिची या खेळात रूची निर्माण झाली होती. मात्र अपंगत्वामुळे ती अनेकदा खचून जायची. अशा कुठल्याही परिस्थितीवर मात करायचे ध्येय उराशी बाळगून ती परिस्थितीशी झुंजत राहिली. मोठ्या मेहनतीने तिने सरकारी नोकरी मिळवली. मात्र सरकारी नोकरीवरच न थांबता आपल्या आई - वडिलांसाठी आणि समाजासाठी काहीतरी आगळं-वेगळं करण्याच्या हेतूने ती सतत धडपडत होती.
अत्यंत आव्हानात्मक खेळाची निवड केली : त्यानंतर तिला दिव्यांगांसाठी सुद्धा काही खेळ असल्याची माहिती मिळाली. तिने या खेळांमध्ये देखील अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या व्हिलचेअर तलवारबाजीची निवड केली. या खेळात तिने प्रचंड मेहनत घेत आपली कर्तबदारी सिद्ध केली आहे. असे म्हणतात की, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आकाशही ठेंगणे करू शकतो. त्याचाच प्रत्यय अनुराधाच्या बाबतीत आलेला आहे.
मेहनतीचे चीज झाले : आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अनुराधा या खेळात नैपुण्य प्राप्त करत गेली. हळूहळू तिला अनेक पदके मिळाले. आता तिला राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे तिच्या मेहनतीचे चीज झाले आहे. राज्य शासनाने देखील तिच्या मेहनतीची दखल घेतली असल्याने अनुराधाने आता आपल्याला आत्मिक सुख मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा :