बुलढाणा : जिल्ह्यात हल्ली बलात्कार, हिंसाचार याचे प्रमाण वाढले आहे. आता एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटात नातेवाईकासोबत फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून बोराखेडी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आहे.
बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर सात ते आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिशातील ४५ हजार रुपये सुद्धा लुटले- बुलढाणा येथील एकजण नातेवाईक असलेल्या महिलेसोबत दुपारी खडकी येथे जात होते. दोघेही रस्त्यातील देवीच्या मंदिराजवळ असलेल्या राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले. यावेळी सात-आठ जण आले. त्यांनी या दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. तर आरोपींनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरीत नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. तर पीडित महिलेच्या गळ्याला चाकू लावून पुरुषाच्या खिशातील ४५ हजार रुपये सुद्धा लुटले.
जोपर्यंत या गुन्हेगारांवर गंभीर गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही. - आमदार संजय गायकवाड
आमदार संजय गायकवाड अत्यंत आक्रमक : ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. सोबतच पोलिस प्रशासनाला देखील चांगलेच धारेवर धरले. तत्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनीसुद्धा पोलीस स्टेशनला गर्दी केली होती. महिलेवर बलात्कार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही तब्बल चार तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे आमदार संजय गायकवाड अत्यंत आक्रमक झाले. गेल्या दीड महिन्यात या राजुर घाटात तब्बल सहा ते सात सामुहिक बलात्कार झाले असल्याचेही आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. जिल्ह्यातील राजुर घाटात फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांवर, मुलींवर येथील बाहेरून आलेली टोळकी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बलात्कार करतात असा, आरोप संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे.
नागरिकांच्या मनात शंका : जोपर्यंत या गुन्हेगारांवर बलात्काराच्या स्वरूपाचे गंभीर गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही, अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली. राजूर घाटात फिरण्यासाठी जाण्याबाबत नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. त्यांना राजूर घाट आता सुरक्षित वाटत नाही. असेच चालत राहिले तर काही दिवसांनंतर राजूर घाटात कुणी फिरकण्याचे नाव देखील घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा :