बुलडाणा - भारतीय निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबरला विधानसभेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाकरिता २१ ऑक्टोबर २०१९ला मतदान होणार असून २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०१९ रोजी पूर्ण होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात विधानसभा निवडणूक २०१९ विषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत आदी उपस्थित होते.
मतदारांच्या सुविधेसाठी १९५० हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर मतदार निवडणूक विषयी माहिती प्राप्त करू शकतो. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचार संहीता उल्लंघन व तत्सम तक्रारी असल्यास सामान्य नागरिक केवळ एक फोटो अथवा व्हिडीओ काढून सी- व्हिजील या अॅपवर टाकून निदर्शनास आणू शकतो. त्यानंतर भरारी पथक सदर तक्रार केलेल्या स्थळावर जाऊन शहानिशा करून तक्रारींवर कारवाई करतील, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी नमूद केले.
जिल्ह्यातील ७ मतदारसंघातील मतदान केंद्रांची माहिती
जिल्हयात एकूण ७ विधानसभा मतदारसंघ असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात एकूण २२५१ व १२ सहाय्यक मतदान केंद्र, अशी एकूण २२६३ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १ याप्रमाणे ७ महिला मतदान केंद्र, ७ आदर्श मतदान केंद्र व १ अपंग मतदान केंद्र आहे. २१-मलकापूर विधानसभा मतदार संघासाठी ३०० मतदान केंद्र, पुरूष मतदार १ लक्ष ४० हजार ९६३, महिला मतदार १ लाख २६ हजार ७०३ अशी एकूण २ लक्ष ६७ हजार ६६६ मतदार, २२-बुलडाणा विधानसभा मतदार संघासाठी ३३० मतदान केंद्र, सहाय्यक मतदान केंद्र ५, पुरुष मतदार १ लक्ष ५८ हजार ७८० ,महिला मतदार १ लक्ष ४३ हजार १६९ ,तृतीयपंथी मतदार २, अशी ३ लक्ष ४ हजार ९५१ मतदार आहेत.
२३- चिखली मतदार संघासाठी ३१२ मतदान केंद्र, १ सहाय्यक मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लक्ष ५२ हजार ३११, महिला मतदार १ लक्ष ४१ हजार ७६१, तृतीय पंथी मतदार १, अशी एकूण २ लक्ष ९४ हजार ७३, २४- सिंदखेड राजा मतदार संघासाठी ३३२ मतदान केंद्र ,४ सहाय्यक मतदान केंद्र ,पुरुष मतदार १ लक्ष ६३ हजार १०४, महिला मतदार १ लक्ष ४८ हजार १६२, अशी एकूण ३ लक्ष ११ हजार २६६, २५ –मेहकर मतदार संघासाठी ३४८ मतदान केंद्र ,पुरुष मतदार १ लक्ष ५२ हजार ९१०, महिला मतदार १ लक्ष ३९ हजार ७६० अशी एकूण २ लक्ष ९२ हजार ६७० मतदार आहे.
२६- खामगाव मतदार संघासाठी ३१६ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लक्ष ४८ हजार १४, महिला मतदार १ लक्ष ३१ हजार ७११, ३ तृतीय पंथी मतदार, अशी एकूण २ लक्ष ७९ हजार ७२८, २७- जळगाव जामोद मतदार संघासाठी ३१३ मतदान केंद्र, २ सहाय्यक मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लक्ष ५२ हजार ३२५, महिला मतदार १ लक्ष ३६ हजार ७५३, ३ तृतीयपंथी मतदार, अशी एकूण २ लक्ष ८९ हजार ८१, अशी एकूण २२५१ मतदान केंद्र व १२ सहाय्यक मतदान केंद्रावर १० लक्ष ६८ हजार ४०७, पुरुष मतदार, ९ लक्ष ७१ हजार १९ महिला मतदार, व ९ तृतीयपंथी मतदार अशाप्रकारे एकूण २० लक्ष ३९ हजार ४३५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
अपंग मतदारांसाठी विशेष व्यवस्था
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्याला ४ हजार २८८ बॅलट युनीट, ३१२९ कंट्रोल युनीट व ३३८८ व्हिव्हिपॅट मशीन प्राप्त झाले आहे. या प्राप्त मशीनची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीत पात्र कुणाचेही नाव सुटू नये यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम दोन टप्प्यामध्ये राबविण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर या वेळेस अपंग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. अपंग मतदारांना सुविधा होण्यासाठी व्हिल चेअरची व्यवस्था, रॅम्प, वाहतूक सुविधा तसेच गर्भवती स्त्रिया व वयोवृध्द मतदारांकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येतील.
विविध परवानग्या मिळविण्यासाठी ‘सुविधा’ अॅप
मतदारांना निवडणूक विषयक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी, मतदार यादीतील नावाची खात्री करण्यासाठी आयोगाने १९५० हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा उपयोग मतदार करू शकतात. तसेच उमेदवारांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी ‘सुविधा’ अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व ३ मतदान अधिकारी याप्रमाणे ४ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याकरीता ९०५२ कर्मचारी व राखीव ९०५ सह एकूण ९ हजार ९५७ कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी आवश्यकता आहे. निवडणूक कामकाजासाठी १० ते १२ मतदान केंद्राकरीता १ क्षेत्रीय अधिकारी याप्रमाणे २१६ क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावे यादृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज आहे. अवैध दारू, अवैध शस्त्रास्र याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे अंतिम दिनांक ४ ऑक्टोबर आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ आहे. मतदान २१ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी तर निवडणूक प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०१९ रोजी पूर्ण होणार आहे.