बुलडाणा - जिल्ह्यातील शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणीचे भाकीत आज 14 मे रोजी सकाळी वर्तविण्यात आले. या भाकीतानुसार यावर्षी राज्यात साधारण पाऊस पडेल. तर शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, देशाची आर्थिक स्थिती याहीपेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तविण्यात आला आहे. तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे अशी भविष्यवाणी करण्यात आली.
हेही वाचा - चिखलीतील 10 खासगी कोविड रुग्णालयातील 13 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन यावेळी करण्यात आले. तसेच मोजक्या उपस्थितीत सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत चंद्रभान महाराज यांच्या वंशज शिवाजी पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांच्यासह पाच जणांकडून या वर्षीचे भाकीत वर्तविले गेले.
देशासह राज्यातील पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज व देशातील विविध विषयांवरचा अंदाज बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपासून दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्तविण्यात येतो. यंदा मात्र कोरोना संकटामूळे लावण्यात लॉकडाऊनमुळे यावर्षीची घटमांडणीचे भाकीत सोशल डिस्टन्सिंग व अल्प मर्यादित उपस्थित आज शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आले. मांडणी करण्यात आलेल्या कडधान्याची व पानाच्या विड्याचे निरीक्षण करून त्यात झालेल्या हालचालींवरून चंद्रभान महाराज यांचे वंशज शिवाजी पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांच्यासह पाच जणांकडून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार यावर्षी राज्यात साधारण पाऊस पडेल. तर शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली. देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे.
भेंडवळच्या घटमांडणीत करण्यात आले हे भाकीत...
पाऊस – जून महिन्यात पाऊस कमी असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल.अवकाळी पाऊसाचा प्रभाव या वेळेस कमी असणार आहे. मात्र, जनतेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असेले.
पीक – ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील, पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.
नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थितीसुद्धा कमकुवत होईल.
राजा कायम – राजा कायम आहे, मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.
- महिना /पाऊस-
जून - साधारण
जुलै - भरपूर
ऑगस्ट - कमी
सप्टेंबर - कमी
..अशी केली जाते घटमांडणी...
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते व काही खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. या घटांमध्ये रात्रभरात होणाऱ्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस भविष्यवाणी केली जाते .या भविष्यवाणीमध्ये शेतीविषयक, राजकारण, नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील, याबाबत अंदाज वर्तविले जातात. शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवळला येत असतात व भाकीत ऐकून त्यावरुन शेतकरी वर्षभरातील शेतीचे नियोजन करतात.
हेही वाचा - मुस्लिम समाजाने घरी राहूनच ईद साजरी करावी, धर्मगुरुंनी केले आवाहन