बुलडाणा - मेहकर मतदार संघातील शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रायमूलकर यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचाराकरिता औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायमूलकर हे आपल्या गाडीने (एम. एच 28 ए. झेड. 7771) काल (शुक्रवार) जानेफळ येथून परत येत होते. रात्री सव्वा नऊच्या दरम्यान नायगाव भालेगाव जवळ समोरून येणाऱ्या वाहनाने (एम. एच. 28 9701) रायमूलकरांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात संजय रायमूलकर, चालक पंजाब गुडधे, सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर निकस हे तिघेही जखमी झाले आहेत. या तिघांनाही प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : अजित पवारांच्या सत्काराला अवघी बारामती; मात्र सुप्रियांसह रोहित पवार अनुपस्थितच