बुलडाणा - बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र अन् कन्या या दोघा बहीण, भावाचे विवाह सोहळे वरवंट येथे शुक्रवारी १७ एप्रिलला पार पडले. कोरोनाचे संकट बघता दोन्ही वेगवेगळ्या लग्न समारंभात गायकवाड, जेऊघाले आणि बाहेकर परिवाराकडून एकूण १४ वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. लग्नात सर्व वऱ्हाडींचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले तर सर्वांनी तोंडावर मास्क बांधून सोशल डिस्टन्सिंग ठेवल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. सोबतच दोन्ही वर-वधु तोंडावर मास्क बांधून विवाहाची विधी पार पाडली..
मुलगा अन् मुलीचा एकाच मांडवात होणारा विवाह, पुढे न ढकलता हे शुभमंगल सावधान करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांचे सुपूत्र चि.कुणाल (मृत्यूंजय) व वरंवंड येथील जेऊघाले परिवाराची सुकन्या चि.सौ.का. मयुरी यांचा तर आ.गायकवाडांची एकुलती एक कन्या चि.सौ.का.रोहिणी तथा जि.प. सदस्या सौ.सविताताई गणेशराव बाहेकर यांचे सुपूत्र चि. मयूर यांचा शुभविवाह आज शुक्रवार १७ एप्रिल रोजी पार पडला. मुलाचा विवाह वरवंड येथील एका शेतात कोणालाही न सांगता सकाळी १० वाजता तर मुलीचा विवाह बुलडाणा येथील राहत्या घरी अगदी गल्लीतल्याही कोणाला न बोलवता दुपारी २ वाजता पार पडला.
वास्तविक पाहता या तिन्ही कुटुंबातील हा पहिलाच विवाह सोहळा होता व गायकवाड, जेऊघाले व बाहेकर या तिन्ही परिवारांच्या नातेवाईकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र यावेळी जेऊघाले व बाहेकर परिवारातील ७-७ सदस्य आणि गायकवाड परिवारातील घरचेच सदस्य ७४ आहेत, पण गायकवाड परिवारातील केवळ ७ सदस्य या विवाह प्रसंगी उपस्थिती होते. म्हणजेच दोन्ही वेगवेगळ्या लग्न समारंभात एकूण १४ च्या जवळपास वऱ्हाडी उपस्थिती होती. यावेळी लग्नात सर्व वऱ्हाडींचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले तर सर्वांनी तोंडावर मास्क बांधून सोशल डिस्टन्सिंग ठेवल्याचा आ.संजय गायकवाड यांनी सांगितले. सोबतच दोन्ही लग्न समारंभात वर-वधुंनी तोंडावर मास्क बांधून विवाहाची विधीवत पार पाडली. तर ‘कोरोना’मूळे राज्यावर ओढवलेले आर्थिक संकट व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने जगण्याचा दिलेला मूलमंत्र, यामूळे सामाजिक जाणिवांचे भान ठेवून हा विवाह सोहळा सुरक्षित अंतर ठेवून साध्या पध्दतीने साजरा केल्याच्या भावना आ.संजय गायकवाड व माजी नगराध्यक्षा सौ.पुजाताई गायकवाड या वर-वधू मात-पित्यांनी व्यक्त केल्यात.